Ad will apear here
Next
चाफा बोलेना...
संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा बोलेना’ हे गाणं. १९ जानेवारी हा वसंत प्रभूंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद...
......
खूप दिवसांनी श्वेताशी फोनवर गप्पा झाल्या. दैनंदिन कामाच्या धबडग्यात मनमोकळ्या गप्पा मारायला हल्ली वेळ कुठे मिळतो? म्हणून खास सुट्टीच्या दिवशी वेळ काढून आम्ही बोललो. तिनं सांगितलं, ‘प्रतिमा, तू दिलेल्या चाफ्याला खूप छान फुलं आलीयत, इतकी सुंदर फुलं आहेत ना! बंगल्याच्या प्रवेशद्वाराशीच लावलेला हा चाफा नेहमी तुझी आठवण करून देतो. कधी येणार बघायला?’ फोनवरच्या गप्पा संपल्या आणि दिवसभर माझ्या मनात चाफा फुलत राहिला. श्रोत्यांना मी कवी ‘बीं’चा ‘चाफा’ ऐकवलासुद्धा. सुरुवातीला न बोलणारा, न फुलणारा; पण शेवटी भरभरून फुललेला. लतादीदींच्या स्वरांचा दरवळ घेऊन मनाच्या अंगणात उभा असलेला चाफा...

चाफा खंत करी काही केल्या फुलेना...

पुणे विद्यापीठात शिकत असताना खेर वाङ्मय भवनाकडून कँटीनकडे जाण्यासाठी जी पाऊलवाट होती ती मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्या वाटेवरून चालताना माझी मैत्रीण अरुणा आणि इतर वर्गमित्र-मैत्रिणी यांच्यासोबत मराठी साहित्य, पुस्तकांविषयी झालेल्या गप्पा ‘मर्मबंधातली ठेव’ आहेत. आमच्या विद्यार्थिदशेतल्या उमलत्या साहित्यप्रेमाला साक्षी होती विद्यापीठातली चाफ्याची झाडं. विद्यापीठात अनेक प्रकारची झाडं आहेत; पण त्यातील ‘चाफा’ मात्र माझ्या मनात अजूनही फुलत असतो. देवचाफ्याची ती झाडं, फांद्याफांद्यांवर फुलं माळून उभी असायची. त्या वेळी मला वाटायचं, की एखाद्यानं हातामध्ये फुलं धरून स्वागताला सज्ज व्हावं ना, तशी ही झाडं हातात फुलं धरून उभी आहेत! विद्यापीठात येणाऱ्यांचं स्वागत करण्यासाठीच जणू ‘चाफा’ उभा आहे. असं हे माझं चाफ्याशी नातं फार जुनं... आकाशवाणीत आल्यानंतर श्रोत्यांसाठी गाणी प्रसारित करताना मालती पांडे यांच्या स्वरातला ‘हिरवा चाफा’ असो, की सुरेश वाडकर यांनी गायलेला ‘सरीतला सोनचाफा’ असो, जो प्रीतभावनेला हळुवार साद घालणारा असतो, पण कवी ‘बीं’चा लतादीदींच्या स्वरातला चाफा मात्र एका पारलौकिक विश्वाची अनुभूती देणारा असतो, जिथं अर्थांच्या अनेक शक्यता नाकारता येत नाहीत. कवितेच्या प्रत्येक कडव्यातला अर्थ शोधणं म्हणजे एक वेगळीच काव्यानुभूती घेणं असतं.

गेले आंब्याच्या वनी
म्हटली मैनांसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून रे

गेले केतकीच्या बनी
गंध दरवळला बनी
नागासवे गळाले देहभान रे

जिवा-शिवाचं मिलन, आत्मा-परमात्म्याचं मीलन कवीला अभिप्रेत असावं. शुद्ध प्रीतीची भावना निसर्गप्रतिमांच्या रूपातून कवी ‘बी’ यांनी अभिव्यक्त केली आहे. अतिशय विशाल अशी काव्यदृष्टी असलेल्या या कवीनं स्वत:चं ‘बी’ हे नाव धारण करणं, यामागेसुद्धा कल्पक दृष्टी आहे असं वाटतं. नारायण मुरलीधर गुप्ते हे कवी ‘बी’ यांचं मूळ नाव. त्यांचे सन्मित्र शंकर दीक्षित यांनी त्यांना ‘बी’ हे नाव दिलं. बी म्हणजे ‘B’ हे इंग्रजीतलं मुळाक्षर नाही, तर ‘Bee’ अर्थात मधमाशी या अर्थानं! मधमाशी जसा विविध फुलांतला मध चाखते, गोळा करते, तसंच कवी ‘बी’ इंग्रजी साहित्याचा आस्वाद घेत आणि त्याचा मराठी अनुवाद करत. आस्वादकाच्या भूमिकेतून वैश्विक घटनांचा, निसर्गाच्या विविध रूपांचा आणि मानवी भावभावनांचा खेळ त्यांच्या मनात सदैव सुरू असायचा. त्यातूनच त्यांची काव्यफुलं फुलत गेली, ती ‘फुलांची ओंजळ’ त्यांनी रसिकांना अर्पण केली.

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर इथं कवी ‘बी’ यांचा जन्म झाला; पण यवतमाळ आणि अमरावती इथं त्यांचं शिक्षण झालं. घरच्या बिकट परिस्थितीमुळं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. विधी खात्यात त्यांनी कारकून म्हणून त्यांनी नोकरी केली. केशवसुतांच्या कवितेचा त्यांच्या मनावर खोलवर झालेला संस्कार, मनात रुजलेलं कवितेचं बी त्यांना ‘कवी’ म्हणून ओळख देऊन गेलं. 

वसंत प्रभू आणि कवी बी‘चाफा’ ही तीन तीन ओळींच्या कडव्याची कविता वसंत प्रभू यांनी निवडली. संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा’ हे गाणं. संगीतकारानं गाणं तयार करण्यासाठी कवितेत जागा कशा शोधल्या, गाण्याच्या खुणा त्यांना कशा सापडल्या हेही कवितेसारखंच गूढ वाटतं. माझ्यासारख्या सामान्यजनांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर एकच, ते म्हणजे संगीतकाराची असामान्य प्रतिभा! ती वसंत प्रभूंपाशी होती. म्हणून तर ‘चाफा’ हे गीत असामान्य, अलौकिक स्वरांनी साकारलेलं एक चिरंजीव लेणं ठरलं. चिरंजीव या शब्दाला सखोल अर्थ आहे. हे गीत म्हणजे मानवी आणि दैवी प्रतिभेचा सुरेख मेळ आहे. पिढ्यान् पिढ्या त्यातील काव्यात्मकतेचा आणि स्वरतत्त्वांचा संस्कार रुजत राहणार, अनेक धुमारे फुटत राहणार. कवी ‘बीं’चं हे गीत आणि वसंत प्रभू यांचं संगीत रसिकांचं भावविश्वय सदाहरित आणि सदासतेज ठेवणारं आहे. या कवितेतली सर्व कडवी न घेता काही कडव्यांचाच समावेश संगीतकारानं केलाय, तरीही कुठेही कवितेच्या आशयाला धक्का लागलेला नाही. मधली पाच कडवी वगळलेली आहेत.

आले माळ सारा हिंडुन 
हुंबर पशुसवे घालुन
कोलाहलाने गलबले रान.
कडा धिप्पाड वेढी
घाली उड्यांवर उडी
नदी गर्जुन करी विहरून
मेघ धरू द्यावे
वीज चटकन लवे
गडगडाट करी दारुण.              

इत्यादी कडवी वगळून एकदम ‘चल ये रे ये रे गड्या’ या कडव्यावर संगीतकारानं उडी घेतली. काव्याचा अर्थ स्वरांच्या साथीनं वसंत प्रभूंना उलगडता आला आणि लतादीदींच्या मधुर स्वरांनी तो रसिकांप्रत गेला. मधुराभक्तीचं एक प्रतीक म्हणून कवी ‘बीं’चा हा ‘चाफा’ आपल्या मनात घर करतो, तर ज्ञानेश्वेर माऊलींच्या विराणींशी असलेलं नातंही हा ‘चाफा’ आपल्याला सांगतो. अशारीर प्रेम, विषयसुखाच्या पलीकडची अनुभूती देणारं प्रेम, कवी ‘बीं’चा ‘चाफा’ म्हणजे एक रूपकात्मक काव्य आहे. चाफा म्हणजे परमात्मा आणि त्यातल्या आंब्याच्या वनी जाऊन मैनांसवे गाणी गाणारी, झिम्मा-फुगडी खेळणारी तरुणी म्हणजे आत्मा, जीव. परमात्म्याशी अद्वैत साधण्यासाठी त्याला खुलवणारी, फुलवणारी, रुसवा काढणारी, अबोला सोड म्हणणारी, तो फुलत नाही, बोलत नाही म्हणून खंत करणारी तरुणी अर्थात जीव, आत्मा म्हणतो की ‘ जाऊ दे रे, हे विश्वाचे अंगण आपल्याला खेळायला मिळालंय, तर खेळू या ना. लोक काय म्हणतील याचा विचार कशाला करायचा? कारण हे लोक विषयसुखात, वासनेत रमणारे किडे आहेत. विशुद्ध प्रीतीची भावना त्यांना काय समजणार? आत्मा-परमात्म्याचं मीलन त्यांना काय कळणार... शरीरसुखाच्या, विषयवासनेच्या पलीकडचं अशारीर प्रेम, शाश्वत सुखाचा आनंद देणारं शुद्ध रसपान आपण करू या.

जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे

ऐहिक, भौतिक, लौकिक अशा बाह्यसुखापेक्षा आंतरिक, अलौकिक आणि चिदानंदस्वरूप सुख मिळवण्यासाठी धडपडणारा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. अशी अद्वैताची सुरेख संकल्पना कवी ‘बीं’नी ‘चाफा’ या रूपकात्मक काव्यातून मांडली आणि खरोखर प्रतिभावंत संगीतकार वसंत प्रभू आणि लतादीदींच्या मधुर स्वरातून ती सगुण साकार झाली. रसिकांच्याही मनात चाफा सर्वांगाने फुलून आला. आजही तो आकाशवाणीच्या स्वरलहरींमधून ताजा, टवटवीत, सतेजतेनं फुलत राहिलाय...

तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी-चाफा? कोठे दोघे जण रे...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ते पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)


(वसंत प्रभू यांनी संगीत दिलेल्या ‘सप्तपदी हे रोज चालते’ या गीताबद्दल वाचण्यासाठी येथे, तर ‘विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या’ या गीताबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZNWCI
 सुंदर .वाह .अप्रतिम ....1
 चाफा बोलेना हे ठीक आहे, पण आपण जो फोटो टाकला आहे तो चाफा हा नाही
 Juni mahiti milali vachun chan watle
 कवी, संगीतकार, गायिका सर्व च अप्रतिम. सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.
 Khup sundar
Similar Posts
सप्तपदी हे रोज चालते... आज २१ डिसेंबर, जनकवी पी. सावळाराम यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या, वसंत प्रभूंनी संगीत दिलेल्या आणि लतादीदींनी गायलेल्या एका सुंदर गीताचा... सप्तपदी हे रोज चालते...
आधी वंदू तुज मोरया... गणपतीबाप्पा वाजत गाजत आले. भक्तिरसानं ओतप्रोत भरलेल्या गणेशगीतांचे स्वर चहूबाजूंनी ऐकू येऊ लागले. किती नवी-जुनी गाणी! पण एक गाणं मात्र एखाद्या घरात, एखाद्या गणेशमंडळाच्या मंडपात एवढंच नाही, तर तुमच्या आमच्या मनात सदैव वाजत असतं ते म्हणजे ‘आधी वंदू तुज मोरया...’ ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज त्याच गाण्याबद्दल
विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या... जनकवी पी. सावळाराम यांचा आषाढी एकादशीला तिथीनुसार जन्मदिन असतो आणि त्यांची जन्मतारीख आहे चार जुलै. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात पी. सावळाराम यांच्या ‘धागा धागा अखंड विणू या’ या गीताबद्दल...
मृदुल करांनी छेडित तारा... सुमन कल्याणपूर नावाचे शांत, सोज्वळ, सुशील आणि सुमधुर स्वर आणि रमेश अणावकर नावाचे, नेमकी भावना व्यक्त करणारे नि सुरांशी जुळवून घेणारे शब्द.... अवतीभवतीचा कोलाहल विसरायला लावणारी शक्ती या शब्द-सुरांपाशी असते. सुमन कल्याणपूर यांचा ८३वा वाढदिवस २८ जानेवारीला झाला, तर आज, ३० जानेवारीला रमेश अणावकर यांचा १६वा स्मृतिदिन आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language